निफाड, नाशिक, उमेश पारीक, दि. 6 फेब्रुवारी 2024 | शेतकऱ्यांसाठी शेती करणे अवघड होऊ लागली आहे. कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस यामधून सुटल्यानंतर चांगले उत्पादन आल्यास शेतमालास दर मिळत नाही. कधी शेतमालास दर मिळाल्यास सरकारकडून निर्यातबंदीची घोषणा केली जाते. यामुळे शेतमालाचे दर बाजारात कोसळतात. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी करण्याचे आदेश ८ डिसेंबर रोजी काढले होते. त्यानंतर कांद्याचे दर चार हजारांवरुन आता हजारापर्यंत आले आहे. कांद्याबाबत घेतलेल्या त्या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे द्राक्षाचे भाव कोसळले आहे.
द्राक्षांवर 103 रुपये आयात शुल्क
कांदा निर्यातबंदी केल्याने बांगलादेशाने द्राक्षावर अतिरिक्त खर्च काढण्यासाठी शुल्क लावले आहे. बांगलादेशाने आयात होणाऱ्या द्राक्षांवर 103 रुपये आयात शुल्क लावले आहे. यामुळे भारतीय द्राक्षांचे बाजार भाव कोसळले आहेत. 40 ते 50 रुपये दराने विक्री होणाऱ्या द्राक्षांना आता 20 ते 25 रुपये दर मिळत आहेत. यामुळे द्राक्षांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली.
शेतकऱ्यांनी केली ही मागणी
निफाड तालुक्यातील नैताळे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी राजेंद्र बोरगुडे यांनी 30 एकरावर द्राक्ष बागेची लागवड केली. एकरी 2 लाख रुपये खर्च केला. आता मिळणाऱ्या बाजार भावातून उत्पादन खर्च निघणे अवघड झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवावी, तसेच बांगलादेशेतील आयात शुल्क दर रद्द करण्यासाठी हस्ताक्षेप करावा अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी राजेंद्र बोरगुडे यांनी केली आहे.
हे सुद्धा वाचा
भारताची “द्राक्ष राजधानी” म्हणून नाशिक ओळखले जाते. देशातील आघाडीचे द्राक्ष उत्पादक नाशिकमध्ये आहे. देशात होणाऱ्या एकूण द्राक्ष निर्यातीपैकी 55 टक्के निर्यात महाराष्ट्रातून होते. तसेच महाराष्ट्रातील निर्यातीपैकी 75 टक्के निर्यात नाशिक जिल्ह्यामधून होते. सध्या नाशिक जिल्ह्यातील बहुतेक सर्वच द्राक्षबागांमधील द्राक्ष विक्री योग्य झाला आहे. परंतु सरकारच्या धोरणामुळे खरेदीदार नाही. यामुळे कमी भावात माल विक्रीची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे.
Web Title – केंद्र सरकारच्या त्या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत, भाव झाले निम्मे – Marathi News | Grape farmers in Nashik district are in trouble, prices of grapes have collapsed due to onion export ban marathi news