सोयाबीन शेतकर्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सोयाबीन खरेदीची मुदत आज संपणार असल्याने खरेदी केंद्रांवर एकच गर्दी उसळली होती. आता केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली आहे.
सोयाबीन खरेदीला सात दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. 7 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत वाढली आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतल्यानंतर आता मुदत वाढ मिळाली.
सोयाबीनची खरेदी राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आज 31 तारीख ही खरेदीची शेवटची तारीख होती. आम्ही कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेवून ती मुदत वाढवण्यासाठी मागणी केली होती. आमची विनंती मान्य करून पुढील 7 दिवसांची वाढ दिली आहे, अशी माहिती जयकुमार रावल यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल. तुरीची देखील खरेदी होत राहील. 11 लाख टन सोयाबीनची खरेदी झाली आहे, गोडवून कमी पडत आहेत, असे मंत्री रावल म्हणाले.
पुढे परिस्थिती आली तर पुन्हा खरेदी वाढीसाठी मुदत परिस्थिती पाहून घेऊ, असे आश्वासन पण त्यांनी दिले. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मी सांगतो हे तुमचं हक्काचं सरकार आहे, सगळ्या शेतकर्यांचा माल हा खरेदी केला जाईल, असे रावल म्हणाले.
सोयाबीनचे दर कोसळत असल्याने शेतकरी नाराज आहेत. त्यांना सोयाबीनला जादा दर हवा आहे. त्याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या तीन वर्षाचा विचार करता, सोयाबीनच्या दरात 31 टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
Web Title – शेतकर्यांसाठी आनंदवार्ता, सोयाबीन खरेदीसाठी नका लावू लांबच लांब रांगा, इतक्या दिवसांची मुदत वाढ