मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

बी-बियाणे चढ्याभावाने विकल्यास जागच्या जागी कारवाई करा, कृषिमंत्री धनजंय मुंडे यांचे अधिकाऱ्यांना आदेश – Marathi News | Agriculture Minister Dhananjay Munde warns of immediate action if seeds are sold at high prices

मुंबई – राज्यात बी-बियाणांची चढ्या भावाने विक्री करणाऱ्या कृषी दुकानदारांना आता चाप बसणार आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. बी – बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून खतांची अतिरिक्त मागणी देखील येत्या आठवड्याभरात पूर्ण होणार आहे. आता बी – बियाणे आणि खते कीटकनाशके आदींच्या वितरण प्रणालीवर कडेकोट निगराणी होणार असून कृषी विभागासह आता पोलीस खात्याचीही यावर करडी नजर असणार आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज याबाबत राज्यस्तरावर बैठकीचे आयोजित केली होती. प्रत्येक जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील खरीप पिके, त्यांच्या बि-बियाणांची आणि आवश्यक खतांची उपलब्धता, आतापर्यंत झालेला पाऊस, आतापर्यंत झालेली पेरणी, त्याचबरोबर बी – बियाणांची आतापर्यंत झालेली विक्री, संबंधित जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाची आकडेवारी तसेच मागील काळात वितरित करण्यात आलेला किंवा प्रलंबित असलेला पिक विमा या सर्व विषयांचा सुमारे चार तास समग्र आढावा या बैठकीत घेण्यात आला.  या बैठकीतून धनंजय मुंडे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील विभागनिहाय वस्तुस्थिती समजून घेतली.

अतिरिक्त तीन भरारी पथके

बि-बियाणांची चढ्या भावाने विक्री आणि इतर चुकीच्या गोष्टी रोखण्यासाठी एक ऐवजी आता प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त तीन भरारी पथके नेमावेत तसेच या भरारी पथकांनी दररोज कमीत कमी 25 दुकानांवर धडक भेटी देऊन तपासणी करावी, कोणताही गैरप्रकार आढळल्यास जागच्या जागीच गुन्हा दाखल करून परवाना निलंबनाची कारवाई करावी, राज्य शासनाने जारी केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याने आपली स्वतःचा एक इमर्जन्सी हेल्पलाईन आणि व्हॉट्सप नंबर स्थानिक स्तरावर जाहीर करावा, जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी त्यावरील तक्रारीची स्वतः दखल घ्यावी तसेच एक तासात शहानिशा करून त्या तक्रारींचे निरसन करावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले.

हे वाचलंत का? -  राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, मदतीसाठी केंद्राला आवाहन - Marathi News | Drought declared in 40 talukas of the state, appeal to center for help, Chief Minister Eknath Shinde's decision

जागच्या जागी कारवाई

तालुकास्तरावर प्रत्येक तालुक्यात कमीत कमी दहा तरी डमी गिऱ्हाईके दररोज विविध दुकानांवर पाठवून दर तसेच अन्य बाबींची पडताळणी करावी आणि कुठेही कोणताही गैरप्रकार आढळल्यास तात्काळ जागच्या जागी कारवाई करावी. कुणाच्याही दबावाला बळी पडू नये किंवा कोणतेही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा, असेही धनंजय मुंडे बैठकीत बोलताना म्हणाले. प्रत्येक जिल्ह्यात पोलीस दलामार्फत किमान एक उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाचे अधिकारी कृषी विभागासाठी समन्वयक म्हणून या काळात नेमावेत आणि त्यांनी पूर्णवेळ या कामाचे पोलीस सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सांभाळावी, अशा सूचना धनंजय मुंडे यांनी सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना केल्या आहेत.

येत्या दोन दिवसात कारवाई

सोयाबीनच्या उगवण क्षमतेबाबत पेरणीनंतर तक्रारी येतात, त्यामुळे आतापासूनच जनजागृती करून शेतकऱ्यांना घरच्या घरी उगवण क्षमता तपासणी करण्याबाबत मोहीम राबवावी, तसेच खतांचे नमुने वेळोवेळी तपासले जावेत, अशा सूचनाही धनंजय मुंडे यांनी केल्या. या सर्वच्या सर्व कार्यवाहीची अंमलबजावणी येत्या दोन दिवसात करणे अनिवार्य आहे. आवश्यकता असेल तिथे किंवा अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता असेल तिथे महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांचीही मदत घ्यावी, याबाबत आपण वरिष्ठ स्तरावर निर्णय घेऊ असेही धनंजय मुंडे म्हणाले.

हे वाचलंत का? -  NSD कमांडोचे भविष्य शेतीने बदलले, असे काढतो २५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | After retirement, the jawan held the hand of the earth

पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वाढवा

काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे पेरण्याही उशिरा होतील. या दृष्टीने आणि अन्य कारणांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राज्यात सरासरी 35 ते 40 टक्क्यांच्या घरात सध्या पोहोचले आहे. मात्र दरवर्षीचा अनुभव पाहता पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जून महिन्याअखेर 75 टक्क्यांच्या पुढे गेलेच पाहिजे तसेच या बाबीचा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर दर आठवड्याला आढावा घ्यावा अशाही सूचना धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत. बीज बँक, शेडनेट यांसह काही जिल्ह्यातील पिक विमा विषयक सूचना काही जिल्हाधिकारी यांनी मांडल्या, या सर्व सूचना कृषी विभागास लेखी स्वरूपात कळवाव्यात त्या संदर्भात स्वतंत्र बैठका घेऊन तातडीने निर्णय घेतला जाईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

हे वाचलंत का? -  सोयाबीनला या वर्षी मिळणार 8000 चा भाव.. बघा तज्ज्ञांचे मत आणि सविस्तर माहिती…


Web Title – बी-बियाणे चढ्याभावाने विकल्यास जागच्या जागी कारवाई करा, कृषिमंत्री धनजंय मुंडे यांचे अधिकाऱ्यांना आदेश – Marathi News | Agriculture Minister Dhananjay Munde warns of immediate action if seeds are sold at high prices

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj