सांगली जिल्ह्यात झालेला पाऊस.
maharashtra rain update: राज्यातील सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. शेतकरी दिवाळीच्या आनंदात आहे. त्याचवेळी काही भागांत मुसळधार पावसाचे आगमन झाले आहे. या पावसाचा फटका शेती पिकांना बसला आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये शुक्रवारी पहाटे अतिवृष्टी झाली आहे. धुंवाधार पाऊस वाळवासह परिसरामध्ये रात्री आणि पहाटे पडला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अशा पावसामुळे वाळवा परिसरातील ओढ्या-नाल्यांना पूर स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आष्टा -वाळवा रस्त्यावरील छोटा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळपासून बंद होती. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच सांगली जिल्ह्याच्या अनेक भागात देखील रात्री आणि पहाटेच्या सुमारास मुसळधार असा पाऊस पडला आहे.
हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने शुक्रवारी सांगली, सातारा रत्नागिरीत यलो अलर्ट दिला आहे. तसेच लातूर, नांदेड जिल्ह्यातील काही भागांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. शनिवारी रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता मुंबई हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रत्नागिरीत गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा भातशेतीलाही मोठा फटका बसला आहे. रायगड, ठाणे, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
का सुरु आहे पाऊस?
दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागरावर गेल्या काही दिवसांपासून चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील काही भागावर होत आहे. या भागात बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पाऊस सुरु आहे. हा पाऊस 3 नोव्हेंबरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हे सुद्धा वाचा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या ऑक्टोबर हीटचा तडाखा कमी झाला आहे. पुणे, मुंबईसह अनेक शहरांमध्ये सकाळच्या वेळी गारवा जाणवत आहे. यंदा पाऊस चांगल्या झाल्यामुळे थंडीचा कडाका चांगला राहणार असल्याचा अंदाज आहे.
Web Title – Rain Update: दिवाळीत धुवांधार पाऊस, पूलही गेला पाण्याखाली, आयएमडीचे अपडेट काय? – Marathi News | Heavy rain in Sangli district of Maharashtra, chances of rain till November 3