योग्य नियोजन अन् वेळच्या वेळी मशागत केली, तर मुरमाड शेत जमिनीत ऊसाचे विक्रमी उत्पादन घेता येते, हे कोल्हापूरातील लाटवडे गावच्या उद्योजक शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखविले आहे. शंकर पाटील यांचे हातकणंगले तालुक्यातील लाटवडे हे गाव आहे. पाटील कोल्हापूरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. पण त्यांना पहिल्यापासूनच शेतीची आवड आहे .त्यामुळेच आजवर त्यांनी द्राक्ष, केळी, पपई अशी प्रयोगशील शेती केल्याचे पाहायला मिळाले आहे. पेठवडगाव येथे पाटील यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील लांबलचक ऊसाची सध्या राज्यभर चर्चा होत आहे.
५० ते ५५ पेऱ्यांचा लांबलचक ऊस
पारंपरिक पद्धतीने करीत असलेल्या शेतीला फाटा देत त्यांनी आधुनिक पद्धतीने ऊस शेती करून विक्रमी उत्पादन घेण्याचा निर्धार करून त्यांनी ऊसाची लागवड केली. जुलैमध्ये ८६०३२ या जातीची बीज प्रक्रिया करून दोन डोळ्यांच्या कांडीची साडेचार फूट सरी सोडून लावण त्यांनी केली. मुरमाड शेत जमिनीत उगवण ही उत्तम झाली. अन् तब्बल ५० ते ५५ पेरी असणारा लांबलचक वजनदार ऊस सोळा महिन्यात तयार झाला.
हे सुद्धा वाचा
पाटील यांना गुंठ्याला तीन टन उत्पादन घेण्यात यश आले आहे. जाड पेरी असलेला लांबलचक वजनदार ऊस तीन ते चार ठिकाणी तोडूनच त्याची मोळी बांधावी लागतेय. एकसारखा तीन एकरातील हा ऊस तब्बल ३६० टन उत्पादन देणारा ठरणार आहे. यासाठी त्यांना ऊस शेतीतज्ज्ञ सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
पाटील यांच्या तीन एकर शेतात हा 50 ते 55 पेरांचा लांबलचक ऊस वाढला आहे. उसाची शेती परवडत नाही अशी तक्रार त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन फोल ठरविली. शेतीचे योग्य त्या पद्धतीने व्यवस्थापन केले की भरघोस उत्पादन मिळते अन् आर्थिक फायद्याचा गोडवा ही चाखता येतो हे शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
नियोजनातून जादा उत्पादन
एकरी ४२ हजार ऊस राहावेत, यासाठी अतिरिक्त ऊस काढून उसाची संख्या मोजून घेतली. योग्य पद्धतीने मशागत, खतांची मात्रा वेळच्या वेळी देणे, पाण्याचे योग्य नियोजन याचा सुरेख मेळ घातल्याने पाटील यांना एकरी १२० टन उत्पादनाची हमी मिळाली, असे सचिन पाटील यांनी सांगीतले.
Web Title – इतका लांबलचक ऊस पाहीला होता का? कोल्हापूरातील लांबलचक ऊसाची राज्यात चर्चा; बघ्यांची उसळली भाऊगर्दी – Marathi News | Kolhapur Long Sugarcane Have you ever seen a cane so long Long Sugarcane in Kolhapur Discussed in the State; The audience erupted